असल्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं असतं – अजित पवार

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.

दरम्यान, केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलीस स्टेशनमध्ये (Kalva Police Staion) गुन्हा दाखल करण्यात आला असून आता आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रारी दाखल केली आहे.

एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सगळ्या गोष्टींना फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले. आपला महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्रात एक परंपरा चालत आली आहे. कसं बोलावं, काय बोलावं, याचं प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे. हे जे काही बोलतायत ही एक विकृती आहे. अशा पद्धतीने कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. राजकारणात वेगवेगळे विचार आणि मते असू शकतात. पण इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची महाराष्ट्रात कधीही पद्धत नव्हती. विरोधी पक्ष असो कुणीचं अशा प्रकारची वक्तव्य करु नये. मी अशा वक्तव्यांचा निषेध करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.