बंडखोरांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली मागणी मांडावी – फरतडे

करमाळा : राज्यात सुरु असलेल्या सत्ता नाक्याकडे सर्वांच्या लक्ष लागलेले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केले आहे. त्यांच्याबरोबर शिवसेनेतील अनेक आमदार गुवाहाटी (आसाम) येथे आहेत. त्यामुळे सरकार राहणार की कोसळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंडखोरांनी मुंबईत येऊन आपली मागणी मांडावी असे आवाहन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता करमाळा येथील शिवसेनेच्या युवासेना तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे (shambhuraje phartade) यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत शिंदे यांनी ‘मातोश्री’वर येऊन महाविकास आघाडी सरकारला पाठींबा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शिवसेना युवासेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे म्हणाले, शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. शिंदे यांच्याकडून शिवसैनिकांना असे कृत्य अपेक्षित नव्हते, शिवसैनिकांसाठी हा फार मोठा धक्का आहे. शिंदे यांनी त्यांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Thackeray) यांच्याकडे मांडावी व चर्चेतून मार्ग काढावा .आम्ही कायम ठाकरे यांच्या मागे उभा राहणारे शिवसैनिक आहोत, असेही शिवसेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे यांनी म्हटले आहे. यावेळी उपशहरप्रमुख पंकज परदेशी (Pankaj Pardeshi) व जेष्ठ शिवसैनिक लालु कुरेशी (Lalu Qureshi) उपस्थित होते.

शिवसेनेचे तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे म्हणाले, जोपर्यंत कट्टर शिवसैनिक, शाखा प्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख पक्षासोबत आहेत तोपर्यंत धनुष्यबाण व शिवसेना या चार अक्षराला हात लावण्याची हिम्मत कोणाची नाही. बंडखोरांबाबत ते म्हणाले आहेत 2.5 वर्ष मजा मिळेल पण पुन्हा आयुषभर पश्चाताप होणार आहे. जेवढे गेले त्याच्या दुप्पट आमदार करण्याची ताकद शिवसैनिकात आहे, असे फेसबुकवरही त्यांनी म्हटले आहे.