आशियाई देशांमध्ये प्रदूषणामुळे आयुर्मान पाच वर्षांपेक्षा जास्त प्रमाणात होतंय कमी

Air Pollution : वाढत्या वायू प्रदूषणामुळे दक्षिण आशियाई देशांमध्ये प्रति व्यक्ती आयुर्मान पाच वर्षांपेक्षा जास्त प्रमाणात कमी होऊ शकते असं एका अभ्यास अहवालात म्हटलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने आपल्या ताज्या एअर क्वालिटी लाइफ इंडेक्स या अहवालात ही माहिती दिली आहे. (air pollution in asian countries)

जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे आयुष्य गमावलेल्यांची अर्ध्याहून अधिक संख्या या प्रदेशातील आहे असंही या अहवालात म्हटलं आहे. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि लोकसंख्या वाढ हे घटक हवेची गुणवत्ता घसरण्यास कारणीभूत ठरले आहेत. प्रदूषण करणाऱ्या घटकांची पातळी सध्या; शतकाच्या सुरूवातीच्या तुलनेत 50 टक्क्यांहून अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात आरोग्याला धोके निर्माण होणार आहेत.

या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित देश असलेल्या बांगलादेशातील लोकांचे आयुष्य प्रति व्यक्ती सरासरी 6 पूर्णांक 8 वर्षे तर अमेरिकेतील लोकांचे आयुष्य 3 पूर्णांक 6 महिन्यांनी घटणार आहे. आयुर्मानावर हवेतील सूक्ष्म कणांच्या वाढीचा परिणाम मोजण्यासाठी उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे विद्यापीठाने हा अभ्यास अहवाल तयार केला आहे.