मराठवाड्यात ९० टक्के नेते शिंदे गटात; सामान्य शिवसैनिक कुणाच्या बाजूने उभे राहणार ?

संभाजीनगर –  विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर २० जूनला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena)बंड करत मोठी फूट पाडली. एकापाठोपाठ एक असे शिवसेनेचे ४० आमदार शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यानंतर भाजपबरोबर (BJP) सत्ता स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर शिंदे यांनी पक्षसंघटनेत फूट पाडण्यासाठी पक्ष पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांना आपल्याकडे वळवण्यावर लक्ष केंद्रीत केले असून शिंदे गटाने आपला मोर्चा आता खासदारांकडे आणि जेष्ठ नेत्यांकडे वळवला आहे.

मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या संभाजीनगर आणि मराठवाड्यात मोठं खिंडार पडलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाला मराठवाड्यातील पाच आमदारांनी साथ दिली. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदेगटात जाण्याच्या वाटेवर आहेत.  संभाजीनगरमध्ये बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेला खिंडार पडल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील 12 पैकी 9 आमदार (MLA)शिंदे गटात गेले असून संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, संदिपान भूमरे यांचा समावेश शिंदे गटात आहे. उदयसिंग राजपूत हे एकमेव आमदार उद्धव ठाकरे गटातील आमदार म्हणून शिल्लक राहिले आहेत. याशिवाय आमदार बालाजी कल्याणकर,आमदार संतोष बांगर शिंदे गटात गेले असून धाराशिव मधील 3 पैकी 2 आमदार शिंदे गटात गेले आहेत.मराठवाड्यातून आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर त्यांचे अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही आता शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास 90 % शिवसेना फुटल्याचे चित्र आहे. दरम्यान,नेते जरी शिंदे गटात गेले असले तरीही  सामान्य शिवसैनिक कुणाच्या बाजून उभे राहणार हे पाहावे लागणार आहे.