उत्तर प्रदेशात भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी ‘या’ लोकप्रिय पोलीस अधिकाऱ्याने घेतली स्वेच्छानिवृत्ती

 कानपूर – निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच उत्तर प्रदेशातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी व्हीआरएस घेतला आहे. ते भाजपच्या तिकीटावर कन्नौज सदरमधून निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे.  त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली

व्हीआरएसची बातमी येण्यापूर्वी असीम अरुण यांनी शनिवारी दुपारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. असीम अरुणचे वडील श्रीराम अरुण हे उत्तर प्रदेश पोलिसांचे प्रमुख राहिले आहेत. दलित समाजातून आलेले 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असीम अरुण हे उत्तर प्रदेश पोलिसांचे धडाकेबाज अधिकारी मानले जातात.

असीम अरुण यांनी फेसबुकवर लिहिले की,  मी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे कारण आता मला देश आणि समाजाची नवीन पद्धतीने सेवा करायची आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मला भाजपच्या सदस्यत्वासाठी योग्य मानले याचा मला अभिमान वाटतो. पोलिस दलांचे संघटन आणि यंत्रणा विकसित करण्याचा अनुभव घेऊन मी पक्षाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन आणि विविध अनुभव असलेल्या व्यक्तींना पक्षात सामावून घेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपक्रम सार्थकी लावेन.

निवडणूक जिंकून काय करणार?

त्यांनी लिहिले आहे की,सर्वात कमकुवत आणि गरीब व्यक्तीच्या हितासाठी मी नेहमीच काम करण्याचा प्रयत्न करेन, IPS नोकरी आणि आता हा सन्मान, हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी संधीच्या समानतेसाठी निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे आहे. त्यांच्या उच्च आदर्शांना अनुसरून मी अनुसूचित जाती-जमाती आणि सर्व वर्गातील बंधू-भगिनींच्या सन्मान, सुरक्षा आणि उन्नतीसाठी काम करेन.

माझे वडील स्वर्गीय श्री राम अरुण आणि आई स्वर्गीय शशी अरुण यांच्या महान कार्यामुळेच मला हा सन्मान मिळत आहे हे मला समजते.त्याने लिहिले,  मला एकच अडचण आहे की मी यापुढे माझा गणवेश घालू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप मोठा सलाम.