काश्मिरी पंडितांना पुन्हा देण्यात येत आहेत धमक्या; शिवसेनेने केली सरकारकडे कारवाईची मागणी

नवी दिल्ली- एकीकडे केंद्र सरकार(Central Gov) 90 च्या दशकात खोऱ्यातून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचे (Kashmir pandits) पुन्हा खोऱ्यात पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे केंद्राच्या या निर्णयाने संतापलेले दहशतवादी काश्मिरी पंडितांना सतत धमक्या देत आहेत. लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेने काश्मिरी पंडितांना नुकत्याच दिलेल्या धमकीच्या पत्रांच्या निषेधार्थ डोगरा मोर्चा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जम्मूमध्ये निदर्शने केली.

डोगरा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये 90 सारखी परिस्थिती निर्माण करायची आहे, जेणेकरून तिथे राहिलेल्या काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून बाहेर काढता येईल. सरकारने केवळ अशा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करून चालणार नाही, तर अशा घटनांच्या समर्थनार्थ विधाने करणाऱ्या नेत्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमधील (Jammu – Kashmir) बारामुल्ला  जिल्ह्यात काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात काश्मीरमध्ये राहणाऱ्या पंडितांना खोऱ्यातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली आहे. बारामुल्ला येथील काश्मिरी पंडितांच्या वसाहतीमध्ये पोस्टाद्वारे हे पत्र पाठवण्यात आले आहे.

इंग्रजीत लिहिलेले हे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लष्कर-ए-इस्लाम नावाच्या संघटनेचा कमांडर (Commander) असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर काश्मिरी पंडितांनी या पत्राबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा ( Manoj Sinha)यांच्याकडे तक्रार केली असून त्यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.