IND vs AUS Final: फायनल सामना बरोबरीत राहिल्यानंतर कसा निवडला जाणार विजेता? जाणून घ्या नवीन नियम

IND vs AUS Final: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा उत्साह शिगेला पोचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर आज दुपारी होणाऱ्या या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स हा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहतील.

या पार्श्वभूमीवर इथं कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंतिम सामन्यासाठी जाणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या सोयीसाठी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, वांद्रे ते अहमदाबाद आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अहमदाबाद या मार्गांवर सहा विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. दरम्यान, या सामन्याच्या आधी भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण पथकाच्या थरारक हवाई कसरती होणार आहेत.

आता अंतिम सामन्यापूर्वी तुमच्या मनात प्रश्न असेल की हा सामना बरोबरीत सुटला तर विश्वचषक २०१९ प्रमाणे चौकारांच्या संख्येवरुन निर्णय होईल का? तर उत्तर नाही आहे. कारण, आयसीसी ने आता विजेता निवडण्यासाठी काही अन्य नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता फायनलचे नियम जाणून घेऊया.

विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. आता हा सामना बरोबरीत राहिला, तर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचेल. पहिली सुपर ओव्हर असेल, त्यातही निकाल न लागल्यास सामना पुढच्या सुपर ओव्हरमध्ये जाईल आणि सामन्याचा निकाल जोपर्यंत जाहीर होत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर सुरू राहील. होय, विश्वचषक २०१९ प्रमाणे, फक्त दोन नाही तर अधिक सुपर ओव्हर्स असतील, जेणेकरून निकाल घोषित करता येईल. याशिवाय, काही कारणास्तव सुपर ओव्हर शक्य नसल्यास दोन्ही संघांना संयुक्तपणे विजयी घोषित केले जाईल. म्हणजेच दोन्ही संघ ट्रॉफी शेअर करतील.

महत्वाच्या बातम्या-