संजू सॅमसनची अनोखी आहे लव्हस्टोरी! रात्री ११ वाजता पत्नीला पाठवलेला मॅसेज, मग…

Cricketers Love Story: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याच्यात प्रतिभा ठासून भरलेली आहे. परंतु रिषभ पंत, दिनेश कार्तिक, इशान किशन यांसारख्या यष्टीरक्षक फलंदाजांनी भारतीय संघातील आपले स्थान मजबूत केल्याने संजूला फार संधी मिळत नाहीत. मात्र आयपीएलमध्ये हा २८ वर्षीय फलंदाज आपल्यातील प्रतिभेची चुणूक दाखवत असतो. संजू हा क्रिकेटर म्हणून तर भारीच आहे, परंतु त्याची प्रेमकहानीही (Sanju Samson Lovestory) तितकीच रंजक आहे.

फार कमी लोकांना माहिती आहे की, संजूच्या प्रेमाचे धागे कसे जुळले? संजूच्या पत्नीचे नाव चारुलता. चारुलता ही केरळच्या तिरुअनंतपुरमची आहे. पेशानं ती एक युवा उद्योजक आहे. मग एक उद्योजक असलेली चारुलता क्रिकेटपटू संजूला भेटली तरी कशी?

तर संजू आणि चारुलता एकाच कॉलेजमध्ये शिकले. त्यांची भेट तिरुवनंतपुरमच्या इवानियोस कॉलेजमध्ये झाली. या कॉलेजमध्ये चारुलता सायन्सची स्टुडंट होती. तर संजू इंग्रजी साहित्यात बीए करत होता.

पण संजू आणि चारुलताची ओळख कॉलेजमध्ये नव्हे तर फेसबुकवर झाली होती. संजूने एकदा त्याच्या प्रेमकथेबद्दल खुलासा केला होता. संजू म्हणाला होता, “२२ ऑगस्ट २०१३ ला मी चारुलताला फेसबुकवर पहिल्यांदा मेसेज केला. रात्री ११:११वाजता मी तिला हाय असा मेसेज केला.”

“त्या दिवसापासून पाच वर्षांपर्यंत मी तिच्यासोबत माझा एक फोटो पोस्ट करण्याची वाट पाहत होतो. मला जगाला सांगायचे होते की, मी चारुलतावर किती प्रेम करतो आणि ती माझ्यासाठी किती खास आहे,” असेही संजूने पुढे सांगितले होते.

फेसबुकद्वारे ओळख झाल्यानंतर तब्बल ५ वर्षे संजू आणि चारुलताने एकमेकांना डेट केले. मग अखेर २२ डिसेंबर २०१८ला त्यांनी लग्न केले. संजूप्रमाणेच त्याची पत्नी चारुलताही प्रसिद्धीच्या झोतापासून स्वत:ला दूर ठेवते.