महाराष्ट्राचं नशीब ‘असं’ काही घडलं नाही; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली वेगळीच भीती 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या सिल्व्हर ओक  या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, ‘हा हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचं अपयश आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांनी गृह विभागावर टीका केली असून विरोधकांसह सत्ताधारी सुद्धा पोलीस (Police ) प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर  या संपूर्ण प्रकरणावरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात असताना मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra aavhad)  यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. आव्हाडांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. “परवा साहेबांच्या (शरद पवार) घरी हल्ला झाला. हल्ला करणाऱ्यांचा हेतू स्वच्छ नव्हता. त्यांनी शरद पवारांच्या घराची रेकी केली होती. त्यांना शरद पवारांना शारिरीक इजा करायची होती. महाराष्ट्राचं नशीब असं काही घडलं नाही, असं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.