‘त्यांचे’ पोरं दिव्यांग जन्माला येतील, इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याने नवा वाद

अकोला : किर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर महाराज हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर विनोदी व्हिडिओ सर्वात जास्त आवडीनं पाहिले जातात. त्यातलेच व्हिडिओ काही आहेत निवृत्ती महाराज देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांचे असतात. व्हिडीओमुळे ते अनेकदा अडचणीत देखील सापडत असतात. आता इंदुरीकर महाराज यांनी आपले व्हिडीओ युट्युबवर टाकणाऱ्यांसंबंधित एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

आपल्या किर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचं वाटोळं होईल, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी करुन नवा वाद निर्माण केला आहे. अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचं किर्तन आयोजित केलं होतं. आपल्या जीवावर आतापर्यंत 4 हजारांवर लोकांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमवले आणि याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलं, अशी तक्रार इंदूरीकर महाराजांनी आपल्या किर्तनातून व्यक्त केली.

चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरगं जन्माला येईल (हातवारे) हा विनोद नाही, जे सत्य आहे ते. असं इंदुरीकर म्हणाले आहेत.