देशात समृद्धी आणण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग आणि त्यांची मालकी आवश्यक – प्रकाश जावडेकर

पुणे : “आयफोन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, विविध सोशल मीडिया व्यासपीठ या नावीन्यपूर्ण प्रयोगांनी जगभरात मोठी क्रांती घडविली आहे. अशा प्रकारच्या जगातील विविध नावीन्यपूर्ण प्रयोगात भारतीयांनी काही प्रमाणात आपले योगदान नक्कीच दिले आहे, पण नावीन्यपूर्ण प्रयोगात मालकी मिळविणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. देशात समृद्धी आणण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोगांचे मालकी हक्क आवश्यक असून, भारतातील तरुणांनी यासाठी प्रयत्न करावे,” असे मत राज्यसभेचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

सॉफ्टवेअर एक्सपोटर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीईएपी) तर्फे आयोजित ‘स्टार अवार्ड्स’ कार्यक्रमात जावडेकर यांच्या हस्ते कमोडोर आनंद खांडेकर (नि.) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे उत्तम व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध पुरस्कार श्रेणींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या सदस्य कंपन्यांनादेखील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड’चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आनंद देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थित नुकतेच हॉटेल शेरेटन ग्रँड येथे हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया’चे संचालक संजय कुमार गुप्ता , एसईझेड’चे सह – विकास आयुक्त मितल हिरेमठ, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत के. एस., उपाध्यक्ष विद्याधर पुरंदरे, विनिता गेरा, अभिजित अत्रे, कार्यकारी समिती सदस्य शिवराज साबळे, स्वप्नील देशपांडे, आनंद रानडे हे उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ” आयटी क्षेत्रात भारताने गेल्या काही वर्षांत जी प्रगती केली, ती कौतुकास्पद आहे. रोबोटिक, आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि ५ जी तंत्रज्ञान यांच्या साथीने भारत उद्योजकतेच्या नवीन स्तरावर प्रवेश करत आहे. अशा स्थितीत देशात नावीन्यपूर्ण प्रयोग करू इच्छिणारे तरुण मोठा बदल घडवू शकतील. त्यामुळे अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी आय टी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे यावे.”

सत्काराला उत्तर देताना कमोडोर खांडेकर म्हणाले, ” भारतातील तरुण तंत्रज्ञ हे अत्यंत प्रतिभावान आहेत. त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पुणे शहर हे अद्भुत शहर आहे. माहिती तंत्रज्ञान असोत, की इतर क्षेत्र या शहराने देशाचे नेहमीच नेतृत्व केले आहे. त्यामुळेच भविष्यात हे शहर फॅबलेस चिप डिझाईन या विषयातील ‘ हब ऑफ एक्सेलन्स ‘ बनावे अशी माझी इच्छा असून, त्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा.

कार्यक्रमात देशपांडे यांनी संघटनेच्या भविष्यातील वाटचालीबाबत, तर प्रशांत के एस यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य राठी यांनी केले.

यावेळी वितरित करण्यात आलेल्या स्टार अवॉर्डस’मध्ये विकास श्रेणीत, ग्लोबंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस प्रथम पुरस्कार, यूएसटी प्रोडक्ट इंजिनिअरिंग कंपनीस द्वितीय पुरस्कार तर इव्होलेंट हेल्थ सर्व्हिसेस कंपनीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट लोक पद्धती या श्रेणीमध्ये, इव्होलेंट हेल्थ सर्व्हिसेस, एक्स्प्लेओ आणि यूएसटी प्रोडक्ट इंजिनिअरिंग या कंपन्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट नावीन्यता पद्धती (इनोव्हेशन प्रॅक्टीसेस) श्रेणीत एक्स्प्लेओ ग्रुप (प्रथम ), इव्होलंट हेल्थ सर्व्हिसेस (द्वितीय) आणि ग्लोबंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले.

डीईआय श्रेणीमध्ये, थॉटवर्क्स टेक्नोलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्रथम), डेल टेक्नॉलॉजीज (द्वितीय) आणि हार्बिंगर ग्रुप (तृतीय) या कंपन्यांना सन्मानित करण्यात आले.

स्ट्रॅटेजिक अॅकॅडेमिया पार्टनरशिप या श्रेणीमध्ये, यूएसटी प्रोडक्ट इंजिनिअरिंग, शुन्या आयओटी एआय रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.