सोळावं वरीस मोक्याचं..! आयपीएलच्या उद्घाटन सामन्यात अशी असेल चेन्नई आणि गुजरातची प्लेइंग इलेव्हन

अहमदाबाद-  आजपासून इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा (IPL 2023) महासंग्राम सुरू होतोय. हा आयपीएलचा सोळावा हंगाम (IPL 16) असून ‘सोळावं वरीस मोक्याचं’ म्हणत कोणता संघ यंदा ट्रॉफीवर आपलं नाव कोरतो?, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल. तत्पूर्वी या हंगामातील उद्घाटन सामन्यावर आयपीएलप्रेमींच्या नजरा लागून आहेत. ३१ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स (CSK vs GT) संघात आयपीएल १६ चा पहिला सामना रंगणार आहे. गुरू आणि शिष्यामधील हा सामना नक्कीच रंगतदार होईल. परंतु या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.

गुरुवारी (३० मार्च) देशातील अनेक शहरांमध्ये पाऊस झाला. अहमदाबादमध्येही सायंकाळी उशिरा पाऊस झाला. तथापि, चाहत्यांसाठी चांगली बातमी अशी आहे की अहमदाबादमध्ये पाऊस जास्त वेळ पडला नाही आणि लवकरच थांबला. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा संघही नरेंद्र मोदी स्टेडियमवर सराव करताना दिसला. आता पावसाने सामन्यात व्यत्यय आणू नये, अशी प्रार्थना चाहते करत आहेत. सामन्यापूर्वी उद्घाटन समारंभही आयोजित केला जाणार आहे.

सामन्याच्या वेळी अहमदाबादचे हवामान कसे असेल?
Accuweather.com नुसार, सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. या दरम्यान किमान तापमान २९ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (Gujrat Titans vs Chennai Super Kings) यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी सायंकाळी ६.३० वाजल्यापासून रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक बॉलिवूड स्टार्स परफॉर्म करणार आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार, विकेटकीपर), ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, सिमरजीत सिंग.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, केन विलियमसन, श्रीकर भारत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, आर साई किशोर, रशीद खान, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी.