देशभर आम आदमी पार्टीचा विस्तार होत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे?

पुणे – काश्मिरी पंडितांच्या खिल्ली उडवल्याचा आरोप असणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर (Arvind Kejariwal House) आज जोरदार राडा पाहायला मिळाला. काश्मिरी पंडितांच्या (Kashmiri pandit) मुद्द्यावरून दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी  चांगलाच धुडगूस घातल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर (आयपी कॉलेजजवळील लिंक रोड) धरणे आंदोलन सुरू केले. त्यात दीडशे ते दोनशे लोक होते. द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबाबत मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या वक्तव्यावरून हे आंदोलन करण्यात आले. यानंतर एकच्या सुमारास काही आंदोलक दोन बॅरिकेड्स तोडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले आणि तेथे त्यांनी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. यानंतर या लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि बूम बॅरिअरही तोडले.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते रंगा राचुरे यांनी या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. ते म्हणाले,  पंजाब मधील आम आदमी पार्टीच्या अभूतपूर्व यशानंतर आणि भाजपाच्या दयनीय पराभवानंतर भाजप नेत्यांचा तोल सुटत असल्याचे त्यांच्या मागील काही दिवसातील विधानावरून लक्षात येत होते. देशभर आम आदमी पार्टीचा विस्तार होत असल्याने भाजपामध्ये अस्वस्थता आहे. गुजरात स्थानिक निवडणुकीत, विशेषतः सुरत व गांधीनगर येथे ‘आप’ला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाने भाजपचे धाबे दणाणले आहेत. गेले काही दिवस आप वर बेछूट आरोप केले जात होते, ते सर्व प्रकरण भाजप वरच उलटल्यामुळे थेट केजरीवाल यांना निशाणा केल्याचे दिसते आहे.असं ते म्हणाले.