ग्राहकांनी नियमित वीजबिल भरले तरच महावितरण तगणार ?

पुणे : वीज क्षेत्र हा उधारीचा नव्हे तर रोखीचा व्यवसाय आहे. मात्र एकीकडे वीजग्राहकांकडे सुमारे ६५ हजार ४३७ कोटींची थकबाकी आणि दुसरीकडे कर्ज, वीजकंपन्या व इतरांची अशी ५८ हजार ९४० कोटींची देणी अशा दुहेरी कात्रीतून मार्ग काढण्यासाठी महावितरणसमोर वीजबिलांची वसूली हाच एकमेव मार्ग आहे व महसुलाचा देखील एकमेव स्त्रोत आहे. विजेची गरज मूलभूत झालेली असल्याने ग्राहकांना देखील वीजबिलांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा केला तरच महावितरण तगू शकेल असे मत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी व्यक्त केले.

येथील ‘प्रकाशभवन’मध्ये आयोजित पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी संचालक (संचालन)  संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) श्री. योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक (प्र.)  अंकुश नाळे, मुख्य अभियंता  मनीष वाठ (चाचणी), सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती) व परेश भागवत (कोल्हापूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिंघल म्हणाले की, वीज ही मोफत मिळाली पाहिजे किंवा वीजबिल भरले नाही तरी चालेल ही समजूत चुकीची आहे. तशी अपेक्षाही चुकीची आहे. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच महावितरणसुद्धा एक ग्राहक आहे. महावितरणला वीजखरेदीसह कर्जाचे हप्ते व इतर सर्व खर्च हा वीजबिलांच्या वसूलीमधून भागवावा लागतो. दरमहा वसूलीमधील बहुतांश रक्कम ही वीज खरेदीवर खर्च होते. सोबतच  कर्मचाऱ्यांचे वेतन, आस्थापना खर्च, कंत्राटदार तसेच कर्जफेडीचे हप्ते इत्यादींसाठी दरमहा देणी द्यावी लागतात. वीज खरेदीसाठी संबंधीत विविध वीज कंपन्यांना पैसे वेळेत देणे शक्य न झाल्यास व्याज द्यावे लागते तर कधी व्याजावर दंड देखील द्यावा लागतो. त्यामुळे वीजबिलांपोटी मिळणाऱ्या महसूलावरच राज्याच्या वीजक्षेत्राचा आर्थिक डोलारा अवलंबून आहे असे त्यांनी सांगितले.

सिंघल म्हणाले, वीजबिल म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे मूल्यच आहे. वीजजोडणी घेतलीच नाही तर वीजबिल भरण्याचा प्रश्नच नाही. वीजजोडणी घेतल्यानंतर विजेचा वापरच केला नाही तर केवळ स्थिर आकाराशिवाय इतर आकाराचे पैसे भरावे लागत नाही. त्यामुळे वीजबिलाचा नियमित भरणा करणे हे ग्राहकांचे कर्तव्य आहे. मोबाईल, टीव्हीच्या केबल किंवा डीटीएच सेवांचे मुदतीत रिचार्ज केले नाही तर सेवा तत्काळ खंडित केली जाते. मात्र जगण्यातील बहुतांश गोष्टी ज्या विजेवरच अवलंबून आहेत त्या विजेच्या बिलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे वीजबिल प्राधान्याने भरले पाहिजे असे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी स्पष्ट केले.

चुकीचे रिडींग घेतल्यास कठोर कारवाई करा

मीटर रिडींग एजन्सीकडून मीटरचे सदोष किंवा हेतुपुरस्सर चुकीचे रिडींग घेतल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरुस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. परिणामी महावितरणला देखील ग्राहकांचा रोष पत्कारावा लागतो. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत अजिबात सहन केला जाणार नाही. वीजमीटरचे चुकीचे रिडींग घेणाऱ्या मीटर रिडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करा. अशा एजन्सी बडतर्फ करा, थेट काळ्या यादीत टाका असे निर्देश अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  विजय सिंघल यांनी दिले. या बैठकीला पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलातील वरिष्ठ अभियंते व अधिकारी उपस्थित होते.