दहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्राईल नवीन उपाय शोधेल – नेतान्याहू

जेरुसलेम – जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनींनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) यांनी ठोस आणि जलद पावलं उचलण्याचं आश्वासन दिलं आहे.पॅलेस्टिन व्याप्त वेस्ट बँक परिसरात इस्रायली सैन्यानं केलेल्या हल्ल्यात नऊ जण ठार झाल्यानंतर प्रत्युतरादाखल हे हल्ले झाले.दहशतवादाचा सामना करण्यासाठी इस्राईल नवीन उपाय शोधेल असं नेतान्याहू यांनी म्हटलं आहे. पॅलेस्टिन व्याप्त वेस्ट बँकमध्ये सैन्यबळ वाढवण्यात येईल असं इस्त्रायली सैन्यानं म्हटलं आहे.काल जेरुसलेमच्या सिलवान परिसरात झालेल्या गोळीबारामागे 13 वर्षीय पॅलेस्टिनी मुलगा असल्याचं इस्रायली पोलिसांनी सांगितलं.

हल्लेखोरानं प्रार्थनेसाठी जात असलेल्या पाच लोकांवर हल्ला केला असं इस्त्रायली पोलिस दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं.पूर्व जेरुसलेममधील एका सिनेगॉगमध्ये शुक्रवारी झालेल्या गोळीबारात प्रार्थनेसाठी जमले असताना सात लोक ठार झाले आणि किमान तीन जण जखमी झाले. या गोळीबारात हल्लेखोर जागीच ठार झाला.हा हल्लेखोर पूर्व जेरुसलेममधील पॅलेस्टिनी असल्याचं स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे.या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 42 जणांना अटक केली आहे.

हे हल्ले अलिकडच्या काळात इस्राईल वर झालेल्या हल्ल्यांपैकी सर्वात दुखःद असल्याचं इस्रायलचे पोलीस आयुक्त कोबी शबताई यांनी म्हटलं आहे.पॅलेस्टिनी दहशतवादी गटांनी या हल्ल्यांची बाजू घेतली आहे परंतु या हल्ल्यांची जबाबदारी घेतलेली नाही. नेतान्याहू यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलं असून सुरक्षा दलांना त्यांचं कार्य करू द्यावं असं आवाहन केलं आहे.या महिन्यात वेस्ट बँकमध्ये 30 पॅलेस्टिनी दहशतवादी आणि नागरिक मारले गेले आहेत.या दहशतवादी हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे.ज्यांना ह्या हल्ल्यामध्ये आपला जीव गमवावा लागला त्यांच्या कुटुंबीयांप्रती एका ट्विट संदेशाद्वारे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.