‘पंजाबची घटना आणि नानांच्या वक्तव्याचा काही संबंध आहे का हे तपासलं पाहिजे’

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी तक्रार भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी समतानगर पोलीस स्टेशनला केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या नंतर भातखळकर यांना अटक करण्यात आली, त्यावेळी ते समता नगर पोलीस ठाण्यातून बोलत होते.

तसेच पंजाब राज्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबतीत घडलेल्या घटनेचा व नाना पटोले यांनी “मी मोदींना मारू शकतो” या केलेल्या विधानाचा काही संबंध आहे का? याची सखोल चौकशी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने केलीच पाहिजे अशी मागणी आ. अतुल भातखळकर यांनी यावेळी केली.

नाना पटोले यांनी सोमवार दि.१७ जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तरी महाभकास आघाडी सरकारने याविरोधात नाना पटोले वर कोणतीही कारवाई केली नाही. परंतु यापूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर खासदार नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्या नंतर मात्र त्यांना अर्धा तासाच्या आत अटक करण्यात आली. त्यामुळे या राज्यात सत्ताधारीनी काहीही केलं तरी त्यांना वेगळ्या न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय अशा प्रकारची हुकूमशाही या राज्यात सुरू आहे अशी टीका आ.भातखळकर यांनी ठाकरे सरकार वर केली. कांदिवली मध्ये नाना पटोले यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी भातखळकर यांना अटक केली असता विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार ठाकरे सरकार करत असल्याची ही टीका त्यांनी यावेळी केली.

भातखळकर यांनी समता नगर पोलिस ठाण्यात नाना पटोलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असे तक्रार पत्र देखील दिले आहे. तसेच जर नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी संगितले.