‘दौंड, खडकवासला याठिकाणी आपला निसटता पराभव; पुढच्या वेळी या जागा निवडून आणायच्या आहेत’

पुणे – पुणे जिल्ह्याकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना सांगितल्या आहेत. इथली संघटना मजबूत आहे यात काहीच दुमत नाही. कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी पार पाडली आहे, लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांना निवडून दिले आहात. मात्र दौंड,(daund)  खडकवासला (Khadakvasala) याठिकाणी आपला निसटता पराभव झाला. पुढच्या वेळी आपल्याला या जागा निवडून आणायच्या आहेत असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil)  यांनी केले.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हयातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. आज पुणे ग्रामीण मतदारसंघाचा आढावा घेतला. गाव पातळीवर नियमित बैठक घ्या, युवक अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यात फिरतीवर रहावे, विविध कार्यक्रम घ्यावेत, निरीक्षण करावेत व पाठपुरावा करावा असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

प्रदेश कार्यालयातून ज्या सुचना येतात अशा महत्त्वाच्या सुचना लक्षात घेऊन अंमलबजावणी करावी. पक्षाने तुम्हाला पद देऊन एक सन्मान दिला आहे तो सन्मान आपल्याला नको असेल तर दुसऱ्याला संधी द्या. पैसा येतो – जातो पैशांनी निवडणूक जिंकता येत नाही मात्र वेळ गेला की वेळ परत येत नाही हे लक्षात घ्या असेही जयंत पाटील म्हणाले. आम्ही बोलायचे आणि तुम्ही ऐकायचे यातून संवाद होत नाही. तुमच्या- आमच्यात संवाद व्हावा यासाठी ही परिवार संवाद यात्रा आहे. ज्या पक्षात संवाद नाही तिथे यश नाही असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.