उद्धव ठाकरे सर्वात मोठे दलाल, महाराष्ट्र नको, लोकांच्या घरातील चुली पेटवा; नितेश राणेंचा टोला

Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (6 मे) रत्नागिरीतील (Ratnagiri) बारसू (Barsu) गावाच्या दौऱ्यावर गेले आहेत. उद्धव ठाकरे इथे रिफायनरी विरोधकांची भेट घेणार आहेत.

तत्पूर्वी लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांना दिला आहे. चांगले प्रकल्प असल्यास ते गुजरातला आणि ज्या प्रकल्पांमुळे वाद निर्माण होतोय ते प्रकल्प माझ्या कोकणाच्या माथी मारले जात आहेत. हे खपवून घेणार नाही, हुकूमशाहीच्या माध्यमातून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा इशार उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावरुन आता भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, उद्धव ठाकरे हे पेटवा पेटवीची भाषा करत आहेत. पेटवा पेटवी करण्यासाठी ते बारसूत आले आहेत. महाराष्ट्र पेटवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र महाराष्ट्र नाही तर लोकांच्या चुली पेटवा. उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना बारसूमध्ये रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पत्र दिलं होतं. मात्र आता ते विरोध करताहेत. हा विचार नेमका कसा बदलला. हा विचार कोकणच्या जनतेसाठी नाही, तर खिशात पैसे आले पाहिजे. मातोश्रीवर खोके आले पाहिजे म्हणून बदलला, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे दलाल आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल आज बारसू रत्नागिरीत आला आहे. यांना मुंबई मनपाचे कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी, परदेशात जाण्यासाठी आणि कपड्यांची खरेदी करण्यासाठी गुजराती चालतात. आणि कोकणच्या विकासावरून विनोद करतात, याचा विचार जनतेनं केला पाहिजे. उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत हे कोकणच्या विकासाला लागलेला शाप आहे. ही चपट्या पायांची माणसं कोकणात येतात आणि प्रकल्पांना विरोध करतात, असा आरोपही नितेश राणे यांनी केला.