‘कदम रुग्णालय प्रकरण : गर्भपात प्रकरणातील डॉक्टरांची सनद रद्द होणार’

मुंबई : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम रुग्णालयात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉक्टरांची सनद रद्द करण्यात येणार असून, त्यांच्यावर कडक करवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या विषयाला राज्य सरकारने गांभीर्याने घेतले असून, कठोर निर्णय घेतले जातील असे राजेश टोपे म्हणाले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेशजी टोपे म्हणाले, वर्धेत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. राज्य सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. आरोपींच्या विरोधात कठोर निर्णय घेतले जातील. तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आखण्याची भूमिका टोपे यांनी स्पष्ट केली.

हा विषय संवेदनशील असून, आर्वीतील कदम रुग्णालयाच्या घटनेप्रमाणे राज्यातील अशा इतर रुग्णालयांची परवानगी कायमची रद्द करण्यात येईल. त्यांना आरोग्य सेवेची कुठलीही मुभा नसेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

नेमकी काय आहे आर्वीतील घटना ?

वर्धामधील आर्वी येथील कदम रुग्णालयातील डॉ. रेखा कदम यांनी अल्पवयीन मुलीचा ३० हजार रुपयांत गर्भपात केल्याचे प्रकरण उघकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. कदम यांच्यासह अल्पवयीन मुलाच्या आई वडिलांना अटक केली होती. रूग्णालयाच्या मागील परिसरात बायोगॅस प्रकल्पाच्या खड्ड्यात वेस्टेज साहित्य सापडले होते. येथे करण्यात आलेल्या खोदकामावेळी पोलिसांना जमिनीत पुरलेले भ्रूण सापडले. शिवाय पाच कवट्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या. याशिवाय रक्ताने माखलेले कपडे आणि एक गर्भपिशवी आढळून आली होती. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती.