‘कधी कधी लोक विसरतात..’ फायनलला न बोलवल्याने विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले दु:ख

Kapil Dev: भारतीय क्रिकेट संघाने (Team India) पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाने भारताच्या (IND vs AUS World Cup Final) हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेत ६ विकेट्सने यजमानांना अंतिम सामन्यात पराभूत केले. या पराभवानंतर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांची चर्चा रंगली आहे.

१९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू कपिल देव यांनी मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयने वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्मानासाठी माजी विश्वचषक विजेत्या कर्णधारांना आमंत्रित केल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र कपिल देव संपूर्ण सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसले नाहीत. जेव्हा कपिल देव यांना हाच प्रश्न विचारण्यात आला होता की, आज तुम्ही जाणार असल्याची खूप चर्चा झाली, मग तुम्ही का गेला नाहीत? तर मला फोन केला नाही म्हणून मी गेलो नाही, असे कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले.

यावेळी आपल्या व्यथा मांडताना कपिल देव म्हणाले, ‘माझी इच्छा होती की माझ्या ८३ च्या संपूर्ण टीमला बोलावले असते तर अजून बरे झाले असते. पण इतके काम चालू आहे, इतके लोक आहेत, इतकी जबाबदारी आहे की, कधीकधी लोक विसरतात.’  कपिल देव यांच्या या प्रतिक्रियेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली