बाणेर व बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा सूरळीतपणे सुरु ठेवा- चंद्रकांत पाटील

पुणे : बाणेर व बालेवाडी येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याच्या सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

विधानभवन येथे शहरातील पाणी पुरवठ्याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

बाणेर व बालेवाडी परिसरातील नागरिकांला ४६ एमएलडी पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. या पाईपलाईनद्वारे होणारा पाणीपुरवठा सुरळीतपणे राहण्याच्यादृष्टीने दक्षता घ्यावी. बालेवाडी जकातनाका, पाषाण-बाणेर लिंक मार्ग यांच्यासह आदी पाण्याच्या टाकीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना पालकमंत्री   पाटील यांनी दिल्या.

मनपा आयुक्त कुमार म्हणाले, वारजे डब्लूटीपी ते बालेवाडी एकूण १८.९४ किलोमीटर लांबीची जलवाहिनी नियोजित असून त्यापैकी १६.७२ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम सुरु असून ते लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच जुने खराब झालेले पंप बदलून त्याजागी वाढीव क्षमेतेचे नवीन पाईप बसविण्यात येत असून येत्या ६ महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.