‘आदिनाथ’चा कारभार पाटील-बागल एकत्र येऊन कारभार पाहणार; तानाजी सावंत यांची शिष्टाई आली कामाला

करमाळा – आदिनाथ बाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या शिष्टाईमूळे पाटील-बागल एकत्र येऊन कारभार पाहणार असल्याचे आजच्या बैठकीनंतर स्पष्ट झाले आहे.आज पुणे येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आदिनाथ कारखान्याच्या पुढील नियोजनाबाबत बैठक पार पडली. या बैठकीस माजी आमदार नारायण पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल उपस्थित होते. यावेळी आदिनाथ कारखान्याच्या आगामी गाळप हंगामा साठीच्या प्रत्येक आवाहनाचा बारकाईने विचार करुन रणनीती आखली गेली. तसेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नारायण पाटील व रश्मी बागल यांचेबरोबर स्वतंत्र चर्चा केल्याचेही समजते.

आदिनाथ कारखाना हा बंद अवस्थेत असल्याने आता आगामी गाळप हंगाम सुरु करण्यापूर्वी पुर्व हंगामी कर्ज, कामगारांचे वेतन, बाॅयलरसह इतर महत्त्वाच्या मशीनरीची दुरुस्ती, आदिनाथला होणारा वीज व पाणी पुरवठा तसेच गाळप हंगामासाठी ऊस उपलब्धता व काटा पेमेंट आदि सर्व बाबी पाहील्या तर पाटील व बागल यांनी एकत्र येऊनच या सर्व आवाहनांना सामोरे जाण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मांडला व यावर आदरपूर्वक व सकारात्मक प्रतिसाद देऊन पाटील-बागल यांनी एकत्रीतपणे काम करण्याचे ठरवले असल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून मिळाले आहे.

आदिनाथ कारखाना हा आमदार रोहीत पवार यांच्या करारातून मुक्त करण्यासाठी राज्यातील सत्तांतरानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी सततचा पाठपुरावा केला होता व आदिनाथवर ताबा घेण्यासाठी आलेली बारामती अॅग्रोची टिम स्वतः कारखाना कार्यस्थळावर जाऊन कायदेशीररीत्या परत पाठवली होती. बागल गटाकडून विद्यमान संचालक मंडळाने सुद्धा सकारात्मक भुमिका ठेवली होती. तसेच आदिनाथ कारखान्याचा हा लढा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली लढवला गेल्याने आवाहन सहज पेलने शक्य झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आदिनाथ साठी खास वेळ देऊन पाठबळ दिले.या बाबींचा विचार करत आज पाटील व बागल यांना एकत्र येऊन कारभार पहावा या शिष्टाई वजा सुचनेस दोन्ही गटनेतृत्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आदिनाथ बाबत एक नवीन समीकरण तयार झाले असून सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळू लागले आहे. आजच्या या बैठकीनंतर आदिनाथच्या पुढील नियोजनाबाबत मात्र निश्चित गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.