भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या पार्थिव देहावर आज होणार पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार 

नवी दिल्ली- सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिव देहावर आज दिल्ली छावणीतल्या ब्रार स्मशानभूमीत संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रावत यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यावर तसंच या अपघातात वीरमरण आलेल्या इतर अधिकाऱ्यांवरही मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह लष्करी आणि हवाई दलातल्या 11 अधिकाऱ्यांना बुधवारी दुपारी तमिळनाडुत झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आलं होतं.दरम्यान, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी अधिकाऱ्यांचे पार्थिव देह काल रात्री दिल्लीच्या पालम हवाई तळावर पोहोचले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी विमानतळावर जाऊन जनरल रावत आणि इतर अधिकाऱ्यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं.

तत्पूर्वी, जनरल रावत आणि इतर अधिकाऱ्यांचे पार्थिव देह वेलिंग्टनमध्ये जनतेच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी आणि नौसेना प्रमुख अॅडमिरल आर. हरीकुमार यांनी यांनीही पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.जनरल रावत यांचा पार्थिव देह आज सकाळी 11 वाजल्यापासून त्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

रावत यांचं जन्मगाव असलेल्या उत्तराखंड राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी काल संसदेच्या दोन्ही सभागृहात या अपघाताविषयी निवेदन केलं. संरक्षण दलाची तीनही दलं संयुक्तरीत्या या अपघाताची चौकशी करणार असून एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखालील समिती अपघाताची सखोल चौकशी करेल, अशी माहिती राजनाथसिंह यांनी दिली. या अपघातात बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना आता बंगळुरू इथल्या वायुदलाच्या कमांड रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.