बजरंग बलीला कुलूप ठोकून बंद करण्याचा निर्णय; कर्नाटकात काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भडकले पंतप्रधान मोदी

कर्नाटकात बजरंग बलीवरुन भाजप आणि काँग्रेस आमने सामने (BJP vs Congress) आले आहेत. कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सोमवारी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याच्या एका दिवसानंतर काँग्रेसने मंगळवारी बेंगळुरूमध्ये आपले घोषणापत्र जाहीर केले. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ परमेश्वरजी यांनी घोषणापत्र सादर केले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ‘सत्तेत आल्यानंतर एक वर्षाच्या आत भाजपाने आणलेले सर्व अन्यायकारक कायदे आणि लोकविरोधी कायदे रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे आणि बजरंग दल व पीएफआयसह द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर खिल्ली उडवत म्हटले की, “आज हनुमानजींच्या या पवित्र भूमीला मी नतमस्तक होत आहे आणि दुर्दैव पाहा, आज जेव्हा मी हनुमानजींना नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगबलीला कुलूप ठोकून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने आधी श्रीरामाला कुलूप ठोकले होते आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांना बंद करण्याची शपथ घेतली आहे. हे देशाचे दुर्दैव आहे की, प्रभू श्री रामांवरुन काँग्रेस पक्षाला अडचण होती आणि आता जय बजरंगबली म्हणणाऱ्यांचीही काँग्रेसला अडचण होत आहे.”

‘कर्नाटकला देशात नंबर वन बनवणार’
काँग्रेस पक्षाला प्रभू राम असतानाही अडचणींचा सामना करावा लागत होता हे देशाचे दुर्दैव आहे, आता जय बजरंग बलीचा जयघोष करणाऱ्यांचाही ते विरोध करत आहे, असे मोदी म्हणाले. कर्नाटकला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा भाजपचा निर्धार आहे. मी भगवान हनुमानजींच्या चरणी मस्तक टेकून या संकल्पाच्या पूर्तीसाठी कामना करतो, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.