शिवसैनिकांची अक्कल गुडघ्यात, आम्ही काहीही करु शकतो; खैरेंची खासदार नवनीत राणांना धमकी

बीड- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या या टीकेला आता माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी उत्तर दिले आहे. खासदार नवनीत राणा काहीही बोलतात, आम्ही शिवसैनिक आहोत, आमची अक्कल गुडघ्यामध्ये असते, आम्ही काहीही करू शकतो.” असा धमकी वजा इशारा  खैरे यांनी राणा दाम्पत्यांना दिला आहे.(Controversial statement of Chandrakant Khaire)

आता सहन होत नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांना कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही. त्या बाई काय होती, कोण होती हे मला सर्व माहित आहे. आधी राष्ट्रवादीने सपोर्ट केला आता भाजप सपोर्ट करत आहे. या बाई म्हणजे पक्ष बदलणाऱ्या बाई असल्याची टीका खैरे यांनी केली आहे.