‘सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस…’ शरद पोंक्षेंवर किरण मानेंची नाव न घेता टीका

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या मुलीनेही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शरद पोंक्षे यांची लाडकी मुलगी सिद्धी पोंक्षे (Siddhi Ponkshe) हिचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. स्वत: शरद पोंक्षे यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या मुलीच्या यशप्राप्तीची माहिती दिली. यानंतर आता मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी शरद पोंक्षे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करणारी फेसबुक पोस्ट केली आहे.

नुकतीच शरद पोंक्षे यांनी मुलगी सिद्धी एका प्रायव्हेट विमानाची पायलट झाल्याची आनंदाची बातमी सांगितली. “कू सिध्दी शरद पोंक्षे आज पायलट झाली. ईयत्ता ४ पासून तिने पाहीलेलं स्वप्न पुर्ण झालं. अत्यंत खडतर परीस्थितीतून,माझं आजारपण,कोरोना, लॉकडाऊन, आर्थिक स्थिती बिकट हे सगळे अडथळे पार करत. कोणतीही सवलत,आरक्षण नसताना केवळ मेहनत ,बुध्दीमत्ता ,परिश्रम व निष्ठा ह्या जोरावर ती पायलट झाली.बापाला आणखी काय हव नाही का?आज अभिमान अभिमान फक्त अभिमान वाटतोय तूझा सिध्दी.मोठी हो पुढे देशाची सेवा कर. उत्तम सेवा दे.करशिलच खात्रीच आहे. लव यू बाळा,” अशी पोस्ट केली आहे.

शरद पोंक्षे यांनी केलेल्या आरक्षणाबाबतच्या टिप्पणीनंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावर बोलताना किरण माने म्हणाले, पोरी, नव्या जगात नवी उड्डाणं घे…

तुझ्या करिअरनं छान ‘टेक ऑफ’ घेतलाय. आता तू जगभर फिरशील… मात्र सगळ्या सीमा पार करून खुल्या आसमंतात भरारी घेताना तुला आश्चर्याचे अनेक धक्के बसतील. घरात लहानपणापासून तुझ्या घरातल्या जवळच्या माणसानं, तुझ्या मनात ज्या थोर व्यक्तीविषयी द्वेष पेरलाय, ती व्यक्ती जगभर पूजनीय आहे, हे कळल्यावर मनामेंदूला बसणाऱ्या हादऱ्याची आत्तापासून तयारी कर. जाशील त्या देशात तुला महात्मा गांधींच्या देशातली मुलगी म्हणून ओळखले जाईल. जाशील त्या गावात तुला बापूजींचा पुतळा दिसेल!

ऑस्ट्रेलियात ब्रिस्वेनमध्ये तुला गांधी भेटेल, ताजीकिस्तानमधल्या ड्युशान्बेमध्येही तुला महात्म्याच्या पुतळ्याचे दर्शन होईल, स्पेनच्या बर्गोस शहरात, चायनाच्या बिजिंगमध्ये, माॅरीशस, सुरीनाम, पोलंड, कोरिया जाशील तिथे गांधी, गांधी आणि गांधीच असेल. इंग्लंडमध्ये लंडन, वेस्टमिन्स्टर अशा अनेक शहरात तुला गांधीपुतळा दिसेल. अमेरीकेत तर भारताखालोखाल विक्रमी संख्येनं तुला आपल्या महात्म्याची मूर्ती दिसेल!

गांधीविचारापुढं नतमस्तक होणारं हे सगळं जग वेडं आहे, की या सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा माणूस माथेफिरू आहे, याचा तू गांभीर्यानं विचार करू लागशील.

…हा विचार करेस्तोवर अचानक तुला दुसरा हादरा बसेल. अमेरिकेत कोलंबिया विश्वविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक दिसेल. लंडनला सर्वांगसुंदर डाॅ. भीमराव रामजी आंबेडकर मेमोरिअल दिसेल! हंगेरीला डाॅ. आंबेडकर हायस्कूल, इंग्लंडमध्ये वॉल्वरहॅम्प्टन बुद्ध विहार पाहून डोळे दिपतील. कॅनडाची सायमन फ्रेझर युनिव्हर्सिटी आणि जपानची कोयासन युनिव्हर्सिटी यांनी डाॅ. आंबेडकरांच्या कार्याची, साहित्याची, शोधनिबंधांची माहिती देणारे विशेष विभाग स्थापलेत तेही पहाशील, लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्समध्येही डाॅ. आंबेडकरांचा पुतळा दिसेल.

या सगळ्या ठिकाणी जगभरातले विद्यार्थी डाॅ. आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचा अभ्यास करताना दिसतील! काहीजण ‘Annihilation of Caste’ वाचत असतील, तर काहीजण ‘The Untouchables: Who were they and why they Became Untouchables’ ची पारायणं करत असतील! तू आंबेडकरांच्या इंडियामधली आहेस हे कळल्यावर त्या विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. ते तुला भारतातल्या हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेबद्दल अनेक प्रश्न विचारतील. हजारो वर्ष ज्यांना शिक्षणापासून आणि सर्व गोष्टींपासून वंचित ठेवलं गेलं होतं. गुलामगिरीत पिचवलं होतं, ते शोषित-पिडीत आता या इनमिन पाऊणशे वर्षांत कुठपर्यंच पोहोचलेत अशीही चौकशी करतील. त्यांना हे सांगू नकोस की ‘मी यश मिळवल्यावर, माझ्या घरातल्या जवळच्या व्यक्तीनं त्या बांधवांना सवलतींवरून टोमणे मारले आहेत’ अजिबात सांगू नकोस हे… कारण जगभर वाईट मेसेज जाईल की या लोकांच्या मनात आजही अस्पृश्यतेचं विष आहे. आपल्या घरात अजून कितीही कचरा असला तरी बाहेरच्यांना तो दिसता कामा नये. त्यामुळं तू त्यांना खोटं हसत बळंबळंच सांग ‘सगळं ठीक आहे आमच्याकडे आता.’

…नंतर मात्र तुझ्या धडावर असलेलं तुझं डोकं वापरून या सगळ्यावर विचार कर. वाचन कर. पुन्हा विचार कर. तुला आसपास फक्त ‘माणूस’ दिसेपर्यंत विचार करत रहा! तू भाग्यवान आहेस की तू अशा क्षेत्रात करिअर करतीयेस जिथं एकाचवेळी अनेक जात, धर्म, वंश, रंग, प्रांत, देशांची अनेक माणसं रोज एकत्र प्रवास करतात! तुला रोज जाणवेल की या जगात जर कुठला धर्म असेल तर तो आहे ‘मानवता’. बाकी सब झूठ. मग तू हेच विचार तुझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये मुरव. तुझ्या आधीच्या पिढीतल्या अविवेकी माणसांनी पसरवलेल्या द्वेषाच्या कॅन्सरवर मात करायची हीच थेरपी आहे पोरी. तुझं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!- किरण माने.’