पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच आटोपली किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद

मुंबई  – राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगला असून एकमेकांच्या नेत्यांना वेगवेगळ्या जुन्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून होताना दिसत आहेत. यातच आता भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या (Neil Somaiya) यांच्यावरती मंगळवारी रात्री उशिरा मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस (Trombay Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील गंभीर आरोप केले होते.

आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी बाप-लेकानी 2013-14 मध्ये एक अभियान चालवलं होतं. त्यावेळी पिता-पुत्रांनी नागरिकांकडून मोठा आर्थिक निधी जमा केला होता. बाप-लेकांनी जमा झालेला निधी राज्यपाल यांच्या सचिवाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु तो निधी राज्यपाल सचिवांकडे जमा न करता त्यांनी अपहार केला असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.ट्रॉम्बे पोलीसांनी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा निल सोमय्या यांच्यावरती कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

किरीट सोमय्यांनी या आरोपांना लगेच पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. मात्र यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारताच सोमय्यांनी पत्रकार परिषद आटोपली. यावेळी अजूनपर्यंत संजय राऊत एक कागदही दाखवू शकले नाहीत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पण एफआयआरची प्रत देत नाहीत. आम्ही एक दमडीचा घोटाळा केला नाही,” असं किरीट सोमय्या म्हणाले.पुढे ते म्हणाले की, “माझं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आव्हान आहे की, ५८ कोटी गोळा केले, कोणत्या चार बिल्डरकडे मनी लाँड्रिंग केलं हे संजय राऊतांनी सांगितलं असून ती माहिती जनतेसमोर ठेवावी. आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं असून घाबरत नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढत असून काढतच राहणार”.