Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Supriya Sule – आज लोकसभेत जम्मू-कश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेसंदर्भातील विधेयक व त्यातील आरक्षणाच्या तरतुदी याबाबत चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्याध्यक्ष तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकारला ओबीसी आरक्षणावरून सवाल करत महाराष्ट्राचा प्रश्न मार्गी कधी निघणार असा सवाल उपस्थित केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात आता आरक्षणांचा सगळ्यात अवघड प्रश्न उभा राहिला आहे. या सरकारचा SC, ST व OBC बाबतची नेमकी भूमिका काय आहे? कारण ते सगळीकडे समान भूमिका ठेवत नाहीयेत. महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. हे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये एक नियम लागू करतंय तर महाराष्ट्रात त्यावर ठोस निर्णय होत नाहीये. मग हे सरकार संपूर्ण देशासाठी एक आरक्षणासंदर्भातलं धोरण का आणत नाही? त्यामुळे देशात व्यवस्थित चर्चा होऊ शकेल असे सुळे म्हणाल्या.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही जम्मू-कश्मीरमध्ये करत असलेल्या चांगल्या गोष्टींचं मी कौतुक करते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज सत्तेच्या विकेंद्रीकरणासाठी आणलं होतं. ही चांगलीच बाब आहे, सत्तेचं विकेंद्रीकरण हे झालंच पाहिजे. पण आज जम्मू-कश्मीरचे लोक दोन गोष्टी मागत आहेत. पहिली म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा आणि दुसरी म्हणजे राज्यात निवडणुका. सरकार यासंदर्भात तारखेसह काही वेळापत्रक देऊ शकतं का? अमित शाह यांनी याआधी अनेक वेळा या सभागृहात, या देशाला आणि जम्मू-कश्मीरच्या लोकांना शब्द दिला आहे की जम्मू-कश्मीरमध्ये ते वर्षभराच्या आत निवडणुका घेणार. एक वर्ष होऊन गेलं आहे. त्यामुळे त्यांची स्वतंत्र राज्याच्या दर्जाची व निवडणुकांची मागणी कधी पूर्ण केली जाईल हे सरकार सांगू शकतं का? असाही प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जम्मू-कश्मीरमध्ये निवडणुका कधी घेतल्या जाणार? आम्हाला हवेतलं उत्तर नको. तीन महिन्यांत वगैरे सांगितलं तरी चालेल. तुम्ही तारीख देऊ शकत नाहीत, निवडणूक आयोग देऊ शकेल हे मला माहिती आहे. पण किमान तुम्ही काही ढोबळ कालावधी तरी देऊ शकता. एवढं तर तुम्ही करू शकता. शिवाय लडाखला लोकप्रतिनिधी सभागृह हवं आहे. त्यांची ती मागणी पूर्ण केली जाणार आहे का? सरकारचं त्यासंदर्भात काय नियोजन आहे? असेही सुप्रियाताई सुळे यांनी केंद्र सरकारला विचारले आहे.

पुढे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, ओबीसी आरक्षण देण्यासाठी अट आहे. महाराष्ट्रातही त्यावर वाद चालू आहे. त्यांचा मुद्दा तिहेरी चाचणीचा आहे. त्यात तीन गोष्टी आवश्यक आहेत. मागासपण तपासण्यासाठी आयोग, कोट्याचं प्रमाण निश्चित करणे आणि हे प्रमाण SC, ST मिळून ५० टक्क्यांच्यावर जाता कामा नये. जम्मू-कश्मीरमध्ये याची तयारी आहे का? नाहीतर आपण इथून विधेयक पारित करून पाठवू आणि प्रत्यक्षात काही होणार नाही. कारण गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात पंचायत, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत. हे आरक्षणाच्या मुद्द्यामुळेच झालं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात नगरसेवक हवे आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य हवे आहेत. पण निवडणुका अडकल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जे होतंय, ते जम्मू-कश्मीरमध्ये होऊ नये यासाठी मी ही विनंती करत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एक ते दीड वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यात भाजप प्रणित ट्रिपल इंजन सरकार आहे. २०० च्या वर राज्य सरकारला आमदारांचा पाठिंबा आहे तरी देखील निवडणुका होत नाही असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?