सांगलीचे वीर सुपुत्र शहीद रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप, सांगली जिल्ह्यावर शोककळा

सांगली : जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवाद्यांशी लढताना सांगली जिल्ह्यातील शिगाव वळवा येथील 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण यांना वीरमरण आले. त्यामुळे सध्यात्यांचा कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. रोमित तानाजी चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीत अलोट जनसागर जमा झाला होता. शहीद रोमित चव्हाण यांचा पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

जम्मू काश्मीरमधील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर भारतीय सैन्यांनी शोध मोहीम हाती घेतली. ही शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्यात सांगलीचे सुपुत्र रोमित चव्हाण शहीद झाले. रोमित चव्हाण काही दिवसांपासून जम्मू काश्मीर येथे देश सेवा बजावत होते.

शहीद रोमित यांचे वडील तानाजी चव्हाण हे सांगलीतील राजारामबापू पाटील साखर कारखान्यात नोकरीला आहेत. त्याचबरोबर आई आणि लहान बहीण असा त्यांचा परीवार आहे. पाच वर्षापूर्वी रोमितने कठीण मेहनत घेऊन मुंबई सैन्य दलात दाखल झाला होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथे सैनिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर ते देश सेवा बजावण्यासाठी जम्मू काश्मीर येथे गेले. रोमित चव्हाण यांचे पार्थिव सांगलीत आणले तेव्हा हजारो लोकांची गर्दी जमा झाली होती. शहीद रोमित अमर रहेच्या घोषात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.