शरद पवारांच्या छत्रछायेखाली मोठे झालात आणि आज उलट्या तांगड्या करताय, मानेंची टीका

Laxman Mane: शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकाराने दुग्धव्यवसाय, कुकूटपालन, शेतीचे विविध प्रयोग सर्वप्रथम बारामतीत आणि त्यानंतर राज्यात राबविले गेले. राज्यात महिला आरक्षण, मंडल आयोग, उद्योग व्यवसाय पवारांच्या पुढाकाराने आले. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृतघ्नपणा थांबवून पवारांच्या माध्यमातून झालेल्या बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासाचा पाया समजून घ्यावा, अशी टीका उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

अजित पवार राजकारणात येण्याआधीच बारामतीच्या विकासाचा पाया शरद पवार यांनी रोवला होता. त्यांचेच बोट धरून अजित पवार राजकारणात आले. शरद पवार यांचे पुतणे म्हणून आणि त्यांच्याच आशीर्वादाने अजित पवार खासदार, आमदार आणि अनेक वर्ष मंत्री राहिले. शरद पवार यांनी कुणासाठी काय केले हे सर्व परिचित आहे. त्यामुळे याची जाणीव ठेवून अजित पवार यांनी कृतघ्नपणा करू नये. शरद पवारांची‌ छत्री नसती तर अजित पवार मोठे झाले असते का ? त्यांच्या‌ छत्रछाये खाली मोठे झालात, आणि आज उलट्या तांगड्या करत आहात, अशीही टीका माने यांनी केली.

शिक्षणासाठी विद्या प्रतिष्ठान, कृषी विकास व विज्ञान केंद्र देशात प्रसिद्ध आहे. अप्पासाहेब पवार यांच्या नावाने औद्योगिक वसाहत उभी केली. बारामतीमधील माणसांचे जीवनमान उंचावले. असे बदल त्यांनी केवळ बारामतीतच नाही तर संपूर्ण राज्यभर घडवले. शरद पवार तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ते केवळ बारामतीचे मुख्यनंत्री नव्हते. पूर्वी बारामतीचे विद्यार्थी शिक्षणासाठी फलटणला जात होते, आता बाहेरचे विद्यार्थी बारामतीला येतात. विद्या प्रतिष्ठान अजित पवारांनी नाही तर शरद पवारांनी सुरू केले. दुधाच्या‌ डेऱ्या सर्वप्रथम बारामतीत सुरू झाल्या. कुकुट पालनाचा प्रयोगसुद्ध बारामतीमध्ये सर्वप्रथम सुरू झाला. साखर कारखान्यांचे नुतणीकरण केले. रेशीम किडे, शेळीपालन हे आप्पासाहेब व शरदरावांनी आणले. शेती या विषयात जेवढे काही बारामतीमध्ये झाले तेव्हढे देशात कुठे झालेले नाही.

मनोज जरांगे पाटील हे मनुवादी आहेत. त्यांच्या कार्यक्रमात एकाही ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा फोटो नसतो. शिवाजी महाराजांचा फोटो असतो, पण तेही त्यांना कळाले नाहीत. जे कुणी मनुवादी असतील त्यांना आरक्षण देऊ नये. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरक्षण देत होते, तेव्हा त्यांनी मिशा वर पिळल्या. मनुवादी विचार डोक्यात होता म्हणून त्यांनी आरक्षण नाकारले. पंजाबराव देशमुखांनी आरक्षण घेतले, त्यामुळे विदर्भ व कोकणातील लोकांना कुणबींचा आरक्षणाचा लाभ मिळाला. गरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांना आमच्या‌ ताटातले देवू नका, त्यांना वेगळे आरक्षण द्यावे. आम्ही भिकारीच आहोत. ते भिकारी का झाले, याचा विचार त्यांनी करावा. सध्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांच्या हाताखाली काम करावे लागते, असे तुच्छतेने म्हणता तर मग आमच्यात का आरक्षण मागता? असाही सवाल लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लज्जास्पद! शेजाऱ्याने मुलीला खोलीत बंद करून मारहाण केली, तिला वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

एलॉन मस्कची लवकरच भारतात एन्ट्री, मिळणार परवाना; जिओ आणि एअरटेलशी थेट स्पर्धा

भारतरत्न प्राप्तकर्त्याला पदकासोबत किती पैसे मिळतात? याच्याशी संबंधित सर्वकाही जाणून घ्या