Lok Sabha 2024 Elections : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Lok Sabha 2024 Elections : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार(Hirdesh Kumar, Deputy Commissioner, Election Commission of India)  यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलिया, वरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोष, सचिव, सुमनकुमार दास, सचिव, भारत निवडणूक आयोग यांचा समावेश होता.

या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणे, मतदार साक्षरता मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणे, इ. उपयायोजना सुचविल्या.

राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेच, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=mTUf-zLP4QE

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन