मेडिकलमधील रोबोटिक सर्जरी प्रणालीची खरेदी प्रक्रिया का रखडली ? आ. चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल 

नागपूर : लाखो रुग्णांना नवसंजीवनी प्रदान करणारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रोबोटिक सर्जरी सिस्टीमची खरेदी प्रक्रिया अडीच वर्षांपासून रखडली आहे. तीनदा निविदा प्रसिद्ध करूनही प्रणालीच्या खरेदीचा मुहूर्त ठरत नाही. याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला, ज्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले.

अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली रोबोटिक सर्जरी सिस्टीम नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने साधारणतः तीन वर्षांपूर्वी १८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. परंतु, विविध अडचणींमुळे ही सुविधा कार्यान्वित होऊ शकली नाही. रोबोटिक सर्जरी सिस्टीम कार्यान्वित झाल्यानंतर मेडिकल हे अत्याधुनिक सुविधा असलेले मध्य भारतातील पहिले रुग्णालय ठरेल. या सिस्टीमचे विविध फायदे आहेत. या सिस्टीमद्वारे शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण तातडीने बरे होतात. शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताचा अधिक प्रमाणात अपव्यय होत नाही. शस्त्रक्रिया अचूकपणे केली जाते. ही सिस्टीम तातडीने कार्यान्वित झाल्यास मध्य भारतातील लाखो रुग्णांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने या प्रणालीची खरेदी करण्याकरिता डिसेंबर – २०१८ मध्ये १८ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी ऑगस्ट – २०१९ मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटला वर्ग करण्यात आला. त्यानंतर हाफकिन इन्स्टिट्यूटने सिस्टीम खरेदीसाठी तीनदा निविदा प्रसिद्ध केल्या. पण विविध तांत्रिक कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली. विधान परिषदेत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरेदीची कार्यवाही पूर्ण झाली का ? नसल्यास वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी कारवाईबाबत कोणतेही भाष्य न करता पुन्हा चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडून सांगण्यात आले.

तीन वर्षे लोटूनही मध्य भारतातील रुग्ण या सुविधेच्या लाभापासून वंचित आहेत. ही प्रणाली मेडिकलमध्ये उपचारार्थ दाखल होणाऱ्या असंख्य रुग्णांना प्रमुख आधार ठरणार आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्रायलयाच्या वेळकाढू धोरणावर आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.