पुरुषांबरोबरच महिला आयपीएलचीही नंबर १ टीम बनणार मुंबई इंडियन्स! कारणही आहेत तसंच

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझी ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. मुंबईने आतापर्यंत विक्रमी ५ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. आता महिला आयपीएलमध्येही मुंबई संघाने गुंतवणूक केली असून पुरुषांप्रमाणेच महिला आयपीएलमध्येही भरघोस यशप्राप्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. त्यासाठी महिला आयपीएल २०२३ च्या लिलावात (WPL Auction 2023) मुंबई संघाच्या मालकीण निता अंबानी या एक मजबूत संघ बनवण्यासाठी प्रयत्नशील दिसल्या.

मुंबई इंडियन्सला आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ बनवण्यात कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) मोठा वाटा राहिला आहे. त्याच्या नेतृत्त्वाखालीच मुंबईने ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. महिलांच्या लिलावात रोहितसारखीच दांडगी कर्णधार शोधण्यावर मुंबईने भर दिला आणि त्यात त्यांना यशही आले. मुंबईने महिला भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिला विकत घेतले.

लिलावात ५० लाखांच्या मूळ किंमतीसह उतरलेल्या भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत (Harmanpreet Kaur) हिला विकत घेण्यासाठी ३ संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स संघांनी हरमनप्रीतवर बोली लावल्या. पुढे मुंबई इंडियन्सने या स्पर्धेत उडी घेतली आणि हरमनप्रीतची किंमत १.५ कोटींच्या पुढे गेली. अखेर मुंबईने १.८ कोटींच्या किंमतीला हरमनप्रीतला ताफ्यात घेतले.

हरमनप्रीतच्या नेतृत्त्वाखाली महिला भारतीय संघ टी२० विश्वचषक २०२० चा उपविजेता राहिला आहे. त्यामुळे मुंबई संघाच्या नेतृत्त्वाची धुरा हरमनप्रीतलाच मिळण्याची दाट शक्यता आहे.