महाज्योतीच्या संघर्षाला विराम;आझाद मैदान मुंबई येथील लढ्याला पूर्णतः यश

मुंबई – महाज्योतीच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या ५३ दिवसांपासून महाज्योती संघर्ष समितीकडून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु होते. आता या लढ्याला यश आले असुन महाज्योतीच्या संघर्षाला विराम मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

१३ मार्च २०२२ पासुन दिवसांपासून महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे(Mahajyoti Vidyarthi Sangharsh Samiti president Nitin Andhale)  यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई येथे इतर मागासवर्ग, भटक्या विमुक्त जाती – जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी असलेल्या महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) या संस्थेच्या प्रश्नांसंदर्भात बेमुदत धरणे आंदोलन चालू होते.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी महाज्योती संस्थेमार्फत PhD-M.Phil करणाऱ्या OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1 जानेवारी 2022 प्रति महिना 31000 रुपये Fellowship देण्याचे मान्य केले आहे. तसेच यूपीएससी व एमपीएससी तयारी करणाऱ्या प्रत्येकी 1500  विद्यार्थ्यांना अनुक्रमे 12000 रुपये व 10000 रुपये मासिक विद्यावेतन व ऑफलाइन क्लास देण्याचे मान्य केले आहे.

याबाबत महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आज खऱ्या अर्थाने ओबीसी, भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी न्यायाचा दिवस आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायप्रिय लोकशाहीच्या स्वप्नाला पुर्णत्त्वाकडे नेणारा हा दिवस आहे. न्याय मागून मिळत नाही न्यायासाठी लढा द्यावा लागतो. आपल्या महापुरुषांची ही शिकवण आपणच अंगिकारायला हवी. संघर्षाच्या तत्त्वज्ञानाला जागून टोकाचा संघर्ष केला. विजय मिळाला. हा विजय मी महात्मा ज्योतिबा फुले यांना समर्पित करतो.

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या लढ्याला ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बळ दिलं त्यांचे आभार, मंत्री महोदय विजय वडेट्टीवारांनी महाज्योती संघर्ष समितीच्या मागण्या मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आम्हाला मिळणारी फेलोशिप व एमपीएससी, युपीएससी विद्यार्थ्यांना मिळणारे मासिक भत्ते महत्त्वाचे आहेत. याचा वापर करुन ओबीसी भटक्या विमुक्तांच्या सक्षमीकरणासाठी आपण सर्व प्रामाणिक प्रयत्न करु. फुले, शाहू, आंबेडकरांच्या स्वप्नाप्रमाणं आपण वंचित घटकांनी सक्षम होऊ. लढलो जिंकलो.हेच सूत्र पुढं राबवू’, असेही आंधळे म्हणाले.