मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत; महिला शिवसैनिकाचा बंडखोर आमदारांना इशारा

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)  यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray)  यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना महिला संघटक, संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची मंगळवारी  शिवसेना भवन येथे बैठक झाली. या बैठकीत साताऱ्याच्या एका महिला पदाधिकाऱ्याने बंडखोरी करणाऱ्या आमदारांना “मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत”, असा इशारा दिला. तसेच जे गेले ते कावळे आहेत आणि राहिले तेच खरे मावळे असल्याचा टोलाही लगावला.

शिवसैनिक महिला पदाधिकारी म्हणाल्या,  बाळासाहेब ठाकरे यांचे विचार माझ्या महिला शिवसैनिकांच्या रक्तारक्तात आहेत. तुम्ही घाबरू नका या कावळ्यांच्या बापाला कुणी घाबरत नाही. माझ्या या सर्व रणरागिण्या कुणाचा कुणीही येऊ द्या, आम्ही त्यांना घाबरत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आधीही नव्हतो आणि आत्ताही नाही. ते गेले उडत. आम्हाला त्यांची गरज नाही. ते उडत गेले, तर आता आमच्या मतदारसंघात येऊ द्या, आम्हीही दांडे सोडून ठेवले आहेत.