मनसेच्या अल्टीमेटमचा धसका ? : गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिले आदेश; म्हणाले, कोणीही असो…

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक (Director General of Police) आणि पोलीस आयुक्त (Commissioner of Police) यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल. गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं आहे की, कुणीही जातीय तेढ (Ethnic rift) निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो,असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

सोशल मीडियावरून (Social media) तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचे पोस्ट शेअर केल्या जात असल्याच्या प्रश्नावरही वळसे-पाटील यांनी उत्तर दिलं. सोशल मीडियावरील पोस्टवर सायबर क्राईम नजर ठेवून आहे. यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. राज्यातील परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का? या प्रश्नाला गृहमंत्र्यांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, पण या विषयासंदर्भात ही भेट नाही. वेगळ्या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, पाटील यांनी सांगितलं.