शिवसेना म्हणजे भरकटलेलं जहाज, बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्तेच शिल्लक राहणार-  विखे पाटील

नगर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. शिवसेनेचे १२ खासदारही बाहेर पडण्याची शक्यता आहे. शिवसेना भरकटलेलं जहाज होतं. यामध्ये बेताल वक्तव्ये करणारे प्रवक्ते होते. आता शिवसेनेमध्ये तेवढेच शिल्लक राहतील असे मला वाटत आहे,” असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

शिवसेनेची काँग्रेसपेक्षा वेगळी अवस्था होईल, असं मला वाटत नाही. आज पक्षाच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास राहिला नाही. याचं दु:ख पक्षनेतृत्वालाही असेल. आज ५५ पेक्षा ४० आमदार आज बाहेर पडले आहेत. आता उरलेल्या १५ आमदारांपैकी आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता आहे,” असे भाकित विखे पाटील यांनी व्यक्त केले.