महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त; शरद पवारांना धक्का

नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त (Maharashtra State Wrestling Council dismissed) करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) हे या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय म्हणजे शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे विरोधात संदीप भोंडवे (Sandeep Bhondwe) यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात कुस्ती संचलनासाठी पुढच्या काही दिवसात ॲड हॉक समितीची निवड करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह इतर निर्णय घेतले जातील.

भाजपचे खासदार बृजभुषण सिंग (Brijbhushan Singh) हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर (Vinod Tomar) हे सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे 40 वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. बाबासाहेब लांडगे (Babasaheb Landage) यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाकडं तक्रार देखील करण्यात आली होती.