छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच होते; अजित पवारांच्या विरोधातील आंदोलन चुकीचे : राष्ट्रवादी

मुंबई – गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji Maharaj) जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला (BJP) मान्य आहे की नाही हे भाजपने पहिल्यांदा सांगावे आणि मान्य नसेल तर गोळवलकरांचे पुस्तक भाजपची अध्यात्मिक आघाडी जाळणार का? हेदेखील सांगावे असे जाहीर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांच्याविरोधात भाजपने पुकारलेले आंदोलन एकदम चुकीचे आहे असेही महेश तपासे म्हणाले. भाजपला छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहासच माहित नाही. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते त्यांनी १२० पेक्षा जास्त लढाया लढल्या व जिंकल्या त्या स्वराज्यासाठीच होत्या याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.

गोळवलकर गुरुजी आणि सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जे अवमानकारक वाक्य लिहिले आहे ते भाजपला मान्य आहे का असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केला आहे. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते, मंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली त्याचा निषेध विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला. आज भाजप जे आंदोलन करत आहे ते दोगलं आहे आणि अजित पवार यांना जाणूनबुजून बदनाम करण्यासाठी आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे राज्यपाल, प्रवक्ते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला त्यांना नरेंद्र पवार तुम्ही पाकिस्तानमध्ये पाठवणार का? अशी विचारणा करतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करताना मूग गिळून गप्प का होतात असा संतप्त सवालही महेश तपासे यांनी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना केला आहे.