ओमीक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ‘या’ जिल्ह्यात करण्यात आली जमावबंदी लागू

अकोला – एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर अकोला जिल्ह्यात पुन्हा नव्यानं जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ओमीक्रॉनची राज्यातली परिस्थिति पाहता संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी कलम 144 अन्वये जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार काल मध्यरात्री शहरात आणि ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, धरणे, आंदोलने किंवा फेरी काढता येणार नाहीत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं अरोरा यांच्याकडून  स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचं काम नियमित सुरू राहणार आहे.

दरम्यान, राज्यात काल 707 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली तर सहाशे 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 64 लाख 86 हजार 782 झाली आहे. तर राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97 .71 टक्क्यांवर स्थिर आहे.

या आजारामुळे काल 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दरही 2.12 टक्क्यांवर स्थिर आहे. राज्यात सध्या 7 हजार 151 रुग्ण उपचाराधीन असून सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. दिवसभरात काल मालेगाव, धुळे, सोलापूर, सांगली-मिरज कुपवाड, अकोला आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रात एकाही नवीन रुग्णाची नोंद झालेली नाही.