कधीतरी घोडीवर बसून, नंतर गायब होणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे – बांदल

पुणे – बैलगाडा घाटात घोडीवर बसलेला गडी बैलांना दिशा दाखवतो. मात्र, कधीतरी घोडीवर बसून, नंतर गायब होणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. उद्या एखादा घोडीवाला येईल आणि तात्पुरता घोडीवर बसेल. पण, उद्या आपल्याला पक्का घोडीवाला पाहिजे. घोडीवाल्यावर लक्ष ठेवा नाहीतर कधी गाडा पलटी होईल सांगता येणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Badal) यांनी शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर केली आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चऱ्होली खुर्द येथे ‘‘महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत’’चे आयोजन केले आहे. महिंद्रा थार, ट्रॅक्टर आणि दुचाकी अशी भव्य बक्षीसे असलेल्या या शर्यती पाच दिवस होणार आहे. या शर्यतीकरीता पंचक्रोशीतील शेतकरी, गाडाप्रेमी नागरिकांनी प्रचंड गर्दी आहे. या घाटावर बोलताना बांदल यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. विशेष म्हणजे, व्यासपीठावर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि वडगाव शेरीची आमदार सुनील टिंगरे हेसुद्धा उपस्थित होते. या व्यासपीठावरच बांदल यांनी डॉ. कोल्हे यांना लक्ष्य केले. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.

राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळाली. त्यानंतर आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गाड्यापुढे घोडी धरली होती. किंबहुना, शर्यती सुरु झाल्यानंतर पहिली घोडी आपण धरणार… असा संकल्प डॉ. कोल्हे यांनी केला होता. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बांदल यांची सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषणांचा अंदाज घेतल्यांतर बांदलांनी राष्ट्रवादी आणि डॉ. कोल्हे यांच्याविरोधात राजकीय दांडपट्टा सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.