“हिंदू नसूनही शाहरुख, आमिरने त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अनेक हिंदू कलाकारांना संधी दिल्या”

अलीकडेच अभिनेते शरद पोंक्षे यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ- आचार्य कालिदास पुरस्कार’ या सन्मानानं गौरवण्यात आलं. त्यांच्या हिंदुत्वासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. या समारंभात शरद पोंक्षेबरोबरच मराठी चित्रपट अभिनेता स्वप्नील जोशी यालाही हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यानंतर मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर (Director Mahesh Tilekar) यांनी मात्र शरद पोंक्षे, स्वप्निल जोशी यांना देण्यात आलेल्या पुरस्कारावर आक्षेप नोंदवताना शाहरुख खान (Shahrukh Khan), आमिर खान (Aamir Khan) या अभिनेत्यांचं कौतुक केलं.

काय म्हणाले महेश टिळेकर?
शरद पोंक्षे, स्वप्नील जोशी या कलाकारांनी हिंदुत्वासाठी असं काय केलं की त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, असा प्रश्न महेश टिळेकर यांनी उपस्थित केला आहे. याचवेळी शाहरुख, आमिरचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, “हिंदू नसूनही लोक, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता हिंदू विधीने स्वत:च्या ऑफिसमध्ये पूजा करणारा आमिर खान असो किंवा वैष्णोदेवीच्या मंदिरात जाणारा शाहरुख खान असो, या कलाकारांनी स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अनेक हिंदूंना जॉब देऊन नव्या कलाकारांना संधी दिली आहे.”

महेश टिळेकर यांच्या या भाष्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.