पुणेकरांनो कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही – मुरलीधर मोहोळ

पुणे : 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये परतलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमिक्रॉन हा कोविड-19 चा नवा प्रकार आढळल्याचं त्याच्या प्रयोगशाळा अहवलातून सिद्ध झालं आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.

त्यानंतर राज्यभर ओमिक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता पुण्यात देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ माजली आहे. पिंपरी चिंचवडमधील 44 वर्षीय रुग्ण बहिणीला भेटायला आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नायजेरियातून आलेल्या तरूणाला ओमिक्रॉन झाल्याचं समोर आलं आहे.

यावर आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देत पुणेकरांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ‘आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यापासून, पुण्यात विमानप्रवास करून येणाऱ्या प्रत्येकाची महापालिकेच्या वतीने RT-PCR टेस्ट केली जात होती. त्यातीलच फिनलँड येथून प्रवास करून आलेल्या एका व्यक्तीला ओमायक्रोन व्हेरियंटची लागण असल्याचे समोर आले आहे. लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे. तरीदेखील खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली आहे.’ अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘पुणेकर नागरिकांनी, कोणत्याही अफवांना बळी पडून घाबरून जाण्याची गरज नाही. महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे आहे.’ अस देखील महापौर मोहोळ म्हणाले आहेत.