‘गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक ही बाब निंदनीय,आम्ही कुणीही त्याचा पुरस्कार करणार नाही’

नाशिक – ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर (Girish Kuber) आज साहित्य संमेलन परिसरात संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांनी शाई फेकली. संमेलनाच्या मुख्य मंचाच्या मागे ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला आहे.

आज दुपारी गिरीश कुबेर यांच्या उपस्थितीत दुपारी दीड वाजता वृत्तपत्रांचे मनोरंजनीकरण अशा विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी जात असताना कुबेर यांच्यावर शाई फेकल्याचा प्रकार घडला.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला गालबोट लागलं ते गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या शाईफेकीमुळे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैचारिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. असे प्रकार घडणं निंदनीय आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण स्वीकारलेलं आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानंतर आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट एखाद्या लेखकाने लिहिली तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ला करणे, ही गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहे आणि आम्ही कुणीही त्याचा पुरस्कार कधीच करणार नाही.