‘एमआयएम’च्या मोर्चाला परवानगी नाहीच, जलील-ओवेसी मोर्चावर ठाम; मुंबईत कलम 144 लागू

मुंबई: मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाकडून औरंगाबाद ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला आहे. थोड्याचवेळात हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. तसेच मुंबईत जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे.

मुस्लिम आरक्षणासाठी MIM पक्षाकडून तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे. मात्र मुंबईत प्रवेश नसल्याने मुंबईच्या सीमारेषेवर मुंबई पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत.मुंबईच्या वेशीवर मुलुंड येथील आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिस सह, राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच असादुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत खासदार इम्तियाज जलील यांनी याबद्दल घोषणा केली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगे झेंडे घेऊन मुंबईत पोहोचणार आहे. या मोर्चानंतर अकबरुद्दीन ओवैसी आणि असादुद्दीन ओवैसीची जंगी सभा होणार आहे असं सांगण्यात आले आहे.

एमआयएमच्या आजच्या तिरंगा रॅलीला मुंबईत परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, रॅली, सभा होणारच. ‘सरकार रॅली दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप जलील यांनी केला आहे. राज्यातील सर्व विभागातून तिरंगा रॅली मुंबईला निघालेत. औरंगाबाद शहरातून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली 320 गाड्यांची रॅली तिरंगा ध्वज लावून मुंबईकडे रवाना झालेत.