राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुजफ्फरनगरमधील शिक्षकेच्या वर्तनाचा निषेध

मोदी सरकारच्या कार्यकाळात देशात जातीय धार्मिक विष पसरलेल्याने अशा घटनेत वाढ

मुंबई- उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये शाळेतील शिक्षिकेने एका मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर विद्यार्थ्यांकडून चापट मारत शिक्षा केली ही घटना अत्यंत दुःखदायक आणि निंदनीय आहे. देश चंद्रावर जरी पोचला असला तरी मनुवादी विचारांच्या लोकांची मानसिकता काही बदलत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या घटनेचा निषेध करते तसेच या शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh tapase) यांनी केली आहे.

महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, शाळेमध्ये विद्यार्थ्याला अशाप्रकारे मारहाण करण्यासाठी शाळा प्रशासन आणि भारतीय राज्यघटना अनुमती देत नाही. परंतु ज्या प्रकारे नऊ वर्षांमध्ये या मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय धार्मिक विष ज्याप्रकारे देश पातळीवर खालच्या स्तरापर्यंत पसरवण्यात आले आहे. त्यामुळे अशा घटना घडत असल्याच्या दिसून येत आहे. धर्मनिरपेक्षता आणि एकात्मतेच्या तत्त्वांचे पालन करण्याचे महत्त्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओळखतो आमचा असा ठाम विश्वास आहे की जात, धर्म किंवा वंशावर आधारित भेदभाव किंवा द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या कृतींना आपल्या वैविध्यपूर्ण आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रबळ असलेल्या देशात स्थान नाही. मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात देशात जातीय आणि समाजाविरोधात रेषे वाढणारी आणि दोन समाजात फूट पाडणाऱ्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली आहे.

आज देश चंद्रावर जरी पोचला असला तरी मनवादी लोकांचे मानसिकता काही बदलत नाही या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. या देशाचे संविधानाचे मूळ स्वरूप धर्मनिरपेक्षता आहे आणि त्याचे जतन देश पातळीवर झालं पाहिजे. शैक्षणिक संस्थांमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर समाजात अशा घटनांना तोंड देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला तातडीने आणि कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन करते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, सहानुभूती आणि एकात्मता वाढवणारे वातावरण निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावणे आवश्यक आहे असे देखील महेश तपासे यांनी म्हटले आहे.