आणखी एका राज्यातील कॉंग्रेसची सत्ता जाणार ? एक्झिट पोलमुळे कॉंग्रेसची चिंता वाढली

नवी दिल्ली- मुंबई : गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश (Goa, Manipur, Punjab, Uttarakhand and Uttar Pradesh) या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची (Assembly Election 2022) रणधुमाळी संपली असून आता देशातील प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व या निवडणुकांमध्ये काय? हा प्रश्न मनातून जात नाही आणि अशातच आता देशातील प्रत्येक चॅनेल आणि प्रत्येक संस्थेने सर्वे करुन आपआपले एक्झिट पोल जाहीर केले आहेत.

दरम्यान, या एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर आता कॉंग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. कारान पंजाब सारखे अतिशय महत्वाचे राज्य कॉंग्रेसच्या हातातून जाऊ शकते असा अंदाज काही एक्झिट पोलमध्ये दाखवला जात आहे. पंजाबमध्ये पक्षांतर्गत गटबाजीशी झुंजणाऱ्या काँग्रेसला सत्तेवरून खेचून आम आदमी पक्ष ११७ पैकी ५१ ते ७५ दरम्यान जागा जिंकेल, असे भाकित या चाचण्यांनी वर्तवले आहे.आपने बहुमताचा ५९ हा आकडा पार केला, तर हा पक्ष राज्यात सत्तेवर येईल. काँग्रेस दुसऱ्या, तर अकाली दल तिसऱ्या क्रमांकावर राहील, असा अंदाज आहे. भाजप येथे दोन आकडी संख्या गाठू शकणार नाही, असे दिसते आहे.

दरम्यान, पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर काल जाहीर झालेल्या मतदानोत्तर कल चाचणीत, उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये सत्तारूढ भाजप आणि कोंग्रेस या पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल असा अंदाज आहे. काही संस्थांच्या सर्वेक्षणानुसार, कोंग्रेसला बहुमत मिळेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिला नसल्याचं कल चाचणीत दिसून आलं आहे. मणीपुरमध्ये भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज आहे.