शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांसमोरच धक्काबुक्की

बुलढाणा : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरु आहे.  मात्र मुद्द्यांची लढाई आता गुद्द्यांवर आली आहे.  बुलढाण्यात (Buldana Shiv sena News) शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.

शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही (Buldana Lathi Charge) करावा लागला. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असा आरोप होत आहे. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक पुढे आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वातावर शांत आहे.