राज्यात स्वाईन फ्लूने वाढवली चिंता, या आमदारालाही झाली लागण

मोर्शी – मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने (Swine flu) चिंता वाढवल्या आहेत. स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाचं टेन्शनही वाढलं आहे. दुसरीकडे मोर्शी वरुड मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार ( MLA Devendra Bhuyar) यांना स्वाईन फ्लूचीलागण झाल्याची माहिती पुढे आली आहे.मुंबईत सध्या ते उपचार घेत आहेत.

सहा दिवसापासून देवेंद्र भुयार रुग्णालयात भरती आहेत. देवेंद्र भुयार यांच्या वरुड मतदारसंघात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या अशी मागणी करणारा देवेंद्र भुयार यांचा रुग्णालयातून व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. माझी प्रकृती स्थिर असून आपणही काळजी घेण्याचं आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी नागरिकांना केले आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांची प्रकृती लवकर बरी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, उमेश गुडधे, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी व आमदार देवेंद्र भुयार मित्र परिवारातर्फे देवाकडे साकडे घातले आहे.

स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात जुलै महिन्यापर्यंत स्वाईन फ्लूचे २३९ रुग्ण आढळले आहेत. तर ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २००९ मध्ये स्वाईन फ्लू जगासमोर आला. व्हायरस फ्लू या नावानेही तो ओळखला जातो. स्वाईन फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा श्वसन रोगाचा एक प्रकार आहे. २००९ मध्ये, या संसर्गाने जगभरातील अनेक जणांचे प्राण घेतले होते.