‘राहुल कनालचे ‘तेव्हाचे’ मोबाईल लोकेशन तपासा, दिशा सालियानच्या केसमध्ये मदत होईल’

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली.

आज सकाळी आयकर विभागाने शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या गल्लीतील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी झाडाझडती सुरू केली आहे.

यावेळी कनाल यांच्या इमारतीखाली सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला आहे. राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही. तसेच हे धाडसत्रं किती दिवस चालेल याचीही काही माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, या कारवाईवर आमदार आणि भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राहुल कनाल यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या केसशी जोडले आहे. ‘राहुल कनाल यांचे ८ आणि १३ च्या रात्रीचे मोबाईल लोकेशन तपासले तर दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांची केस सोडवण्यास नक्की मदत होईल,’ असं नितेश राणे म्हणाले आहेत. तर, पुढे ‘गुन्हेगारीतील भागीदार’ असं म्हणत नितेश राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.